राज्यातील आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास आणि कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, मतदार याद्यांतील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपांवरून महाविकास आघाडीने मुंबईत “सत्याचा मोर्चा” काढत निवडणूक आयोगावर तीव्र निशाणा साधला.
या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, तसेच आघाडीतील इतर प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषणात राज ठाकरेंनी मतदार याद्यांतील दुबार नावे आणि अनियमिततेबाबत निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. त्यांनी कार्यकर्त्यांना “दुबार मतदार सापडल्यास त्यांना थेट बडवा” असं आवाहन केलं.
या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. राज ठाकरे यांचं हे भाषण ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर पलटवार केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केली. “मतदारांमध्ये भेद निर्माण करण्याचा आमचा उद्देश नाही, परंतु काही जणांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदान यंत्रांवर प्रश्न, मतदार यादीवर आरोप, निवडणूक आयोगावर संशय… ही एक आखलेली रणनीती आहे,” असं शेलार म्हणाले. यावरून आता पुढील आठवडाभर दुबार मतदारांवर चांगलीच चर्चा रंगणार असल्याचे दिसत आहे.
त्यांनी पुढे राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवत विचारलं – “राज ठाकरे नेमकं कोणाबद्दल बोलले? कोणत्या मतदारांना ‘बडवा’ म्हणाले? जनता हे सर्व पाहते आहे.”
राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं की, दुबार मतदारांची समस्या सर्व पक्ष मान्य करत आहेत, मग ती काँग्रेस असो, भाजप असो किंवा शिंदे- पवार गट असो. “जर सर्वजण मान्य करत असतील की दुबार मतदार आहेत, तर मग त्यांचं उच्चाटन करा. निवडणुका पारदर्शकपणे घेणं हीच खरी जबाबदारी आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याचं आवाहन करताना स्पष्ट केलं — “एकदा मतदार याद्या स्वच्छ झाल्या, तर नंतर कोणत्याही निकालावर कोणी प्रश्न उपस्थित करणार नाही.”
‘लाव रे तो व्हिडीओ’ पुन्हा ट्रेंडमध्ये
राज ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी सरकारवर टीका करत वापरलेला प्रसिद्ध वाक्प्रचार ‘लाव रे तो व्हिडीओ’ आता भाजपानेच त्यांच्या विरोधात वापरला आहे. त्यामुळे राजकीय पटलावर “व्हिडिओ विरुद्ध व्हिडिओ ” अशी नवी लढाई रंगली आहे. महापालिका निवडणुकीच्या आधीच राज्यातील राजकारणात आरोप–प्रत्यारोपांचा जोर वाढला असून, “दुबार मतदार” या मुद्द्यावरून आगामी आठवड्यांमध्ये आणखी चुरस वाढण्याची शक्यता आहे.
