पाकिस्तानमध्ये आधीच दहशतवाद्यांची कमी नाही, त्यात आता महिलांनाही दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेने महिलांच्या जिहाद ब्रिगेडची शाखा उघडण्याची घोषणा केली आहे. याची माहिती जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूर अजहर याने 21 मिनिटांची ऑडिओ क्लिपद्वारे केली आहे. हा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या क्लिपमध्ये मसूद अजहर महिलांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो दावा करत आहे की, ‘जमात-उल-मोमिनत’ नावाच्या या मोहिमेत सामील होणाऱ्या महिलांना मृत्यूनंतर थेट स्वर्गात (जन्नत) जागा मिळेल. यापूर्वीही जैश-ए-मोहम्मदने महिलांचे ब्रेनवॉश करण्यासाठी ऑनलाइन ‘जिहादी’ कोर्स सुरू केल्याची माहिती मिळाली होती.
‘दौरा-ए-तस्किया’
मसूद अजहर महिलांना तयार करण्यासाठी पुरूषांप्रमाणेच प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. या दहशतवादी मोहिमेला ‘दौरा-ए-तस्किया’ असे नाव देण्यात येणार आहे. या अंतर्गत महिलांमध्ये अल्लाहची सेवा करण्याकरीता विचारसरणी रूजवली जाईल. बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ-अली येथे 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना ‘दौरा-आयत-उल-निसाह’ अंतर्गत ‘जिहाद कसा करायचा’ याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. धक्कादायक बाब म्हणजे, मसूदने या नव्या महिला ब्रिगेडला भारतातील महिला शक्तीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
मसूदने त्याच्या भाषणात म्हटले आहे की, “इस्लामच्या शत्रूंनी हिंदू महिलांना भारतीय सैन्यात भरती केले आहे. महिला पत्रकारांनाही आमच्या विरोधात उभे केले जात आहे. या शत्रूंचा सामना करण्यासाठी आम्ही ‘जिहादी महिला ब्रिगेड’ उभारत आहोत.” ‘जमात-उल-मोमिनत’मध्ये सामील होणाऱ्या महिलांसाठी कडक नियम ठेवण्यात आले आहेत. महिलांना अनोळखी पुरुषांशी फोनवर किंवा मेसेजिंगद्वारे बोलण्यास सक्त मनाई आहे. त्यांना फक्त पती किंवा जवळचे कुटुंबीय यांच्याशीच बोलण्याची परवानगी आहे. मसूदने पाकिस्तानी महिलांना त्याचे ‘ए मुसलमान बहना’ हे पुस्तक वाचण्याचेही आवाहन केले आहे.
या मोहिमेचे नेतृत्व मसूदची बहीण सादिया अजहर हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. मसूदची दुसरी बहीण समीरा अजहर आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार उमर फारूकची पत्नी अफीरा फारूक यांचाही या जिहाद ब्रिगेडमध्ये समावेश आहे.
मसूदने जाहीर केले आहे की, या महिला युनिटच्या शाखा पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात उघडल्या जातील आणि त्याचे नेतृत्व एका महिलेकडेच असेल. स्थानिक महिलांना या मोहिमेत सामील करून घेण्याची जबाबदारीही या प्रमुखाची असेल.
भारतीय लष्करात महिलांची संख्या आणि सामर्थ्य वाढत असतानाच, जैश-ए-मोहम्मद दहशतवादासाठी महिलांचा वापर करण्याचा कट रचत आहे. मसूदने महिलांच्या भरतीसाठी सुरू केलेल्या ‘जमात-उल-मोमिनत’ युनिटचा मुख्य उद्देश मुस्लिम महिलांच्या मनात जिहादी विचारसरणी भरणे आणि त्यांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करणे हा आहे.
पाकिस्तानमधील महिलांना दहशतवादी कृत्यांशी जोडण्याचा मसूद अजहरचा हा प्रयत्न भारतासाठी मोठा धोका मानला जात आहे. जैश-ए-मोहम्मदने गेल्या काही वर्षांत भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत, यामध्ये उरी आणि पुलवामा येथील भ्याड हल्ल्यांचा देखील समावेश आहे.
