अश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने पौर्णिमा साजरी केली जाते. रात्रभर जागरण करून पारंपरिक खेळ, गाणी व कथा सांगण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी भजन-किर्तन ठेवले जाते. खासकरून महिला एकत्र येतात आणि हलका फुलका आहार करून नंतर जागे राहण्याकरीता वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. हा दिवस केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही अतिशय महत्वाचा आहे.
देवी लक्ष्मी व ऐरावतावर आरूढ इंद्र यांची रात्रभर पूजा केली जाते. त्यानंतर पोहे, नारळपाणी व इतर नैवेद्य पितरांना समर्पित करून नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो.
या दिवसाबाबत दोन कथा सांगितल्या जातात
लक्ष्मीविषयक कथा
असे मानले जाते की, या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या व्यक्ती जागरण करून तिची आराधना करतात त्यांच्यावर ती प्रसन्न होते. या संदर्भात श्लोक असा आहे –
“निशीथे वरदा लक्ष्मी: ‘कोजागर्तीति भाषिणी ।
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले ॥”
यावरूनच “को जागरती?” म्हणजे “कोण जागा आहे?” या शब्दांवरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले आहे.
इंद्रविषयक कथा
दुसरी आख्यायिका अशी की, या दिवशी स्वर्गाचा अधिपती इंद्र स्वतः पृथ्वीवर येऊन पाहतो की लोक त्याची पूजा करतात का नाही. त्या संदर्भातील श्लोक पुढीलप्रमाणे आहे –
“लोकांस्त्रीन्पश्यन्भक्त वरप्रदः ।
‘को जागर’ विधानेन मामाराधयतीत्युत ॥”
या कथेप्रमाणे इंद्र आणि त्याचा ऐरावत यांचीही या रात्री विशेष पूजा केली जाते.
या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ येतो, म्हणून तो इतर वेळीपेक्षा अधिक मोठा व तेजस्वी दिसतो. चंद्र हा शीतलता, शांती आणि आल्हाददायकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी चंद्रपूजा केली की जीवनातही शांती व समृद्धी येते असे मानले जाते. रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध उकळून त्याला नैवेद्य दाखवला जातो. दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्यानंतर ते दूध पिण्याची प्रथा आहे. या दुधात मसाले, वेलची, सुका मेवा घालून त्याला विशेष चव आणली जाते.
चांदण्याच्या प्रकाशात आरोग्यवर्धक शक्ती असते असे आयुर्वेदात मानले जाते. त्यामुळे कोजागिरीच्या रात्री चंद्रकिरणांत ठेवलेले दूध पिणे हे आरोग्यदायी मानले जाते. हा पेय थकवा कमी करून शरीराला शीतलता व उर्जा प्रदान करतो.
दसरा आणि दिवाळी दरम्यान येणारी ही पौर्णिमा म्हणजे मित्रमंडळी, कुटुंबीय एकत्र जमून रात्रभर गप्पा, खेळ खेळतात. घरच्या जबाबदाऱ्या आणि कामं विसरून काही वेळ स्वत: ला आणि कुटुंबाला देण्यासाठी हे एक सुंदर निमित्त मानले जाते.
या पौर्णिमेला चंद्र आपल्या संपूर्ण तेजात असतो. त्याची किरणे वातावरणात सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण करतात. लक्ष्मी ही संपन्नतेचे प्रतीक असून इंद्र ही शीतलतेचे आणि आल्हाददायकतेचे प्रतीक मानली जाते. या दोन्ही तत्त्वांचे पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे या दिवशी केलेली पूजा अधिक फलदायी ठरते. म्हणूनच, कोजागिरी पौर्णिमा ही फक्त चंद्रदर्शन आणि दूधपानाची परंपरा नाही, तर ती एक धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी उत्सवाची सांगड घालणारी अनोखी परंपरा आहे.
