मस्साजोग हत्याकांड! कराड – मुंडे आणि धस… 

Political News

संतोष देशमुख यांची हत्या…वाल्मिक कराड..धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि आष्टीच्या सुरेश अण्णाचा ‘धस”का!

मराठवाड्यातला असा एक जिल्हा जो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो तो म्हणजे बीड जिल्हा !
…..पण यावेळी हा जिल्हा चर्चेत येण्याला कारण अत्यंत गंभीर आहे. ते म्हणजे केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी झालेलं अपहरण आणि हत्या… ही हत्या इतकी अमानुष होती त्याचे पडसाद आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटत आहेत. राजकारणातही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पण  याची सुरुवात कुठून झाली? हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे… तर झालं असं; मस्साजोग येथे अवादा कंपनीच्या पवनचक्की प्लांट च्या परिसरात ६ डिसेंबरला संतोष देशमुख यांना मारहाण झाली होती त्याला कारण खंडणीप्रकरण असल्याचं म्हंटल जातं. ९ डिसेंबर रोजी मांजरसूंबा टोलनाक्या जवळून अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर १० डिसेंबरला पोलिसांनी या प्रकरणातील ७ आरोपींपैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चार आरोपींना अटक केली तर ४ जानेवारी २०२५ ला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे फरार आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले. त्यासोबतच हत्येच्या दिवशी मारेकऱ्यांना संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला देखील अटक केली. पण या सगळ्या घटनाक्रमाला राजकीय अँगल आला तो ११ डिसेंबरला जेव्हा केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात एक गुन्हा दाखल झाला त्यात सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासोबत आणखी एक नाव होतं ते वाल्मिक कराड! आणि हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानला जातो… संदीप क्षीरसागर यांनी पहिल्यांदा या हत्याकांडाचा मास्टरमाईंड म्हणून  वाल्मिक कराड याचं नाव घेतलं होतं असं जरी असलं तरी संतोष देशमुख प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर विरोधी पक्षांपेक्षाही जास्त टीका केली ती आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी. २८ डिसेंबरला बीड येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चात ही सुरेश धस यांचा सक्रिय सहभाग होता. सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गावखेड्यात वेगवेगळ्या चर्चाना उधाण आलंय.. कारण सुरेश धस यांना आधीपासूनच मुंडेविरोधी मानलं जातं. २००९ साली धस हे गोपीनाथ मुंडेंविरोधात बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडेंविरोधात निवडणूकही लढवली. तेंव्हापासून मुंडे विरुद्ध धस असा वाद निर्माण झाला…त्यांनतर २०१७ ला सुरेश धस यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी झाली. अनेक राजकीय सभांमध्ये मुंडे भावंडं आणि सुरेश धस एकाच मंचावर दिसले तरी त्यांच्यातील शीतयुद्ध काही लपून राहिलं नाही. २०२४ च्या विधानसभेत सुरेश धस यांनी संपूर्ण ताकद लावत कमबॅक केलं पण पंकजा मुंडेंनी निवडणुकीत आपलं काम न केल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. अशीही चर्चा आहे की सुरेश धस हे भाजपचे अधिकृत उमेदवार असताना पंकजा मुंडेंनी मतदानाला २ दिवस बाकी असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला… म्हणूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून सुरेश धस मुंडे घराण्याला सुरुंग लावत असल्याचं बोललं जातंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याने ३१ डिसेंबरला पुण्यात सीआयडीकडे आत्मसमर्पण केलं. राज्य शासनाने या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून या प्रकरणातील सात आरोपींसह वाल्मिक कराडवरही मकोका कायद्यांतर्गत कारवाई सुरु आहे त्यामुळे वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरलेत त्यामुळे बीडमधील वातावरण चांगलच तापलंय. आता या तपासातून काय सत्य समोर येतंय ? कोण – कोण दोषी आढळतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *