आश्विन महिन्यात पाऊस ओसरत जाऊन हिवाळा सुरू होण्याआधीचा काळ म्हणजे ऑक्टोबर. भौगोलिक परिस्थितींमुळे या महिन्यात उच्च तापमान आणि जास्त आर्द्रता जाणवते म्हणूनच याला ऑक्टोबर हिट असं देखील संबोधल जात. मात्र यंदा हे चित्र बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सप्टेंबर महिना संपला तरी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यंदाची नवरात्र पावसात गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी गेल्या 3 महिन्यात सूर्यप्रकाश अनुभवता आला नाहीय. यात आता केंद्रिय हवामान विभागाने (Indian Meterological Department) ने पुढील 24 तासांसाठी देशभरातील काही राज्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये ओडिशा, गुजरात, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भाग आणि घाटमाथा भागात मुसळधार पाऊस लागणार असल्याचे सांगितले आहे.
पाऊस गेला नसला तरी तुलनेनं पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगितले जात आहे. बंगाल उपसागरात तयार झालेला पट्टा गुजरातच्या दिशेनं सरकत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात ऊन-पाऊस पाहायला मिळेल. मराठवाडा, सोलापूर भागांत पाऊस कमी झाल्याने पूर ओसरण्यास सुरूवात झाली आहे. तरीही मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना 24 तासांचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यंदा दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने नागरिक आता पावसाच्या परतीच्या प्रवासाची वाट बघत आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तराखंड, हिमाचल, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मिरमधून परतले आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा परतीच्या प्रवासाचा वेग मंदावला आहे. यामुळे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
