एका रात्रीत 6 हजार लोकांचे स्थलांतर! दुसऱ्या महायुद्धातील हजार पाउंडचा बॉम्ब निष्क्रिय

News Trending

हाँगकाँगच्या गजबजलेल्या क्वारी बे (Quarry Bay) परिसरात दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने हजारो नागरिकांना तातडीने स्थलांतर करावे लागले. अमेरिकेत तयार झालेला हा सुमारे 5 फुट लांब व 1,000 पाउंड(सुमारे 450 किलो) वजनाचा बॉम्ब एका बांधकाम प्रकल्पादरम्यान सापडला.

हाँगकाँगमधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब आहे. हा बॉम्ब निष्क्रिय आहे किंवा नाही हे पाहणे म्हणजे अत्यंत जोखमीचे असल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू नये यासाठी जवळपास 1,900 घरांमधील सुमारे 6,000 नागरिकांना त्वरीत स्थलांतर करण्याचे आवाहन केले.

बॉम्बमध्ये सुमारे 500 पाउंड टीएनटी स्फोटक असल्याचे पोलिसांनी सांगितले. यादरम्यान तुफान पाऊस सुरू असून सुद्धा बॉम्ब शोधक पथकाने जोखीम पत्करत रात्री 2 वाजल्यापासून काळजीपूर्वक काम करत शनिवारी सकाळी जवळपास 11.45 वाजेपर्यंत बॉम्ब निष्क्रिय केला. सुदैवाने बॉम्ब निकामी होईपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान हाँगकाँगवर जपानी सैन्याचा ताबा होता आणि अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे शहरात अनेक बॉम्ब टाकण्यात आले होते. यावेळी काही बॉम्ब स्फोट होण्याआधीच जमिनीत गाडले गेले. बांधकामादरम्यान अनेकदा काही ठिकाणी स्फोट घडले आहेत. तर काही जिवंत बॉम्ब मिळाले आहेत. याच वर्षी कोलोन, जर्मनी येथे तीन अमेरिकन बॉम्ब सापडल्यामुळे तब्बल 20 हजार लोकांना स्थलांतर करावे लागले होते.

Leave a Reply