बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो का? संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानावर शिवसैनिकांचा संताप

News Political News Trending

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर ठाण्यात शिवसैनिकांमध्ये संताप पाहायला मिळाला. राऊत यांनी “आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते, उपनेते नव्हते, तर ते जिल्हाप्रमुख होते, असे वक्तव्य केले. यानंतर ठाण्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून टेंभीनाका येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करत निषेध नोंदवण्यात आला.

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावण्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, शिंदे यांचे नेते मोदी आहेत. मग बाळासाहेबांच्या शेजारी जिल्हाप्रमुखाचे फोटो का लावले जात आहेत? ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा सवाल त्यांनी केला. त्यांचा या विधानानंतर ठाण्यातील शिवसैनिकांनी राऊत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आनंद दिघे हे ठाण्यातील शिवसैनिकांसाठी आजही गुरूस्थानी आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी राऊत यांना दिला आहे.

90 च्या दशकात शिवसेना मजबूत करण्याचे काम आनंद दिघे यांनी केले होते. शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत शिवसेना पोहचविण्यामध्ये दिघेंचा मोठा वाटा होता. 23 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले असले तरी आजही ठाण्यात त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आजही शिवसैनिकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे “आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा” अशी ठाण्याची ओळख झाली.

Leave a Reply