मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात तणाव निर्माण करणारी एक घटना घडली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला काही अज्ञातांनी लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार घडला. यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, घटनास्थळी पोहचून मीनाताईंच्या पुतळ्यावर फेकलेला रंग साफ केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई देखील उपस्थित होते. घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, माँ साहेबांच्या पुतळ्यावर कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला. अशा समाज कंटकी लोकांचा सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस शोध घेत आहेत. मात्र अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे, असे ते म्हणाले.
या प्रकारानंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. मात्र, पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.
