नवरात्री हा शक्तीचा उत्सव आहे. भारतामध्ये देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. देवीची अनेक जागृत देवस्थानं भारतामध्ये आहेत. त्यातीलच सतीच्या देहाचे भगवान शंकरांनी केलेले ५२ तुकडे ही ५२ शक्तिपीठं प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, यातील ५१ च शक्तिपीठं भारतात आहे आणि एक पाकिस्तानात ! पाकिस्तानातील हे मंदिर नानी का मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, तर या देवीची यात्रा नानी का हज म्हणून ओळखली जाते. अगदी सिंधी मुस्लिमही या देवीच्या मंदिरात जातात. कोणते आहे हे शक्तिपीठ आणि काय आहे तिची कथा जाणून घेऊया…
Delhi Flight news : आश्चर्य! काबूलहून थेट आला दिल्लीत; अफगाणी मुलाचा विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून प्रवास
भारतीय उपखंडामध्ये देवी सतीची (पार्वती) ५२ शक्तिपीठे आहेत. हिंगलाज माता शक्तीपीठ (हिंगलाज देवी, हिंगुला देवी) पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतामधील ल्यारी जिल्ह्यातील हिंगलाज या गावात आहे. हिंगोल नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरातील एका डोंगराच्या गुहेत हे मंदिर आहे. पाकिस्तानातील मुस्लिम लोक या मंदिराला नानी का मंदिर म्हणूनही ओळखतात. हिंदू समजाबरोबराच पाकिस्तानातील अनेक मुस्लिम लोक या मंदिराची वार्षिक यात्रा करतात. ही यात्रा पाकिस्तानात नानी का हज म्हणून प्रसिध्द आहे.
मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि इतिहास
हिंगलाज माता मंदिराविषयी बऱ्याच गोष्टी असल्या तरी लोकप्रिय कथेनुसार, प्रजापती दक्षांची कन्या सती आणि भगवान शंकर यांचा विवाह झाला होता. प्रजापती दक्ष यांना शिवशंकर जावई म्हणून अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे भगवान शंकरांचा अपमान करण्याच्या संधीची ते वाट पाहत होते.
प्रजापती दक्षांनी एकदा एक मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. सर्व देवादिकांना यज्ञाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. परंतु भगवान शंकरांना मात्र आमंत्रण दिले नाही.
आपल्या पतीचा असा अपमान झालेला पाहून देवी सतीने वडिलांच्या यज्ञकुंडत कुंडात उडी घेतली. आपल्या पत्नीचा मृत्यू झालेला पाहून भगवान शंकर संतापले. त्यांनी आपल्या पत्नीचे मृत शरीर घेऊन आपला तिसरा डोळा उघडला आणि अतिशय विनाशकारी असे तांडव नृत्य करण्यास सुरुवात केली. तिन्ही लोकात हाहाकार माजला.
भगवान शंकर शांत झाले नाहीत तर विश्वाचा नाश होईल हे भगवान विष्णूंना कळून चुकले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे ५२ तुकडे केले आणि ते ५२ निरनिराळ्या ठिकाणी नेउन टाकले. हिंगलाज येथे देवी सतीचे मस्तक(ब्रह्मरंध्र) येऊन पडले. त्यामुळे ५२ पीठांपैकी हिंगलाज हे सर्वात महत्त्वाचे पीठ मानले जाते.
हिंगलाज माता यात्रा
पाकिस्तानातील अनेक हिंदू आणि भारतातील (मुख्यत्वे राजस्थान आणि गुजरातमधील) अनेक लोक हिंगलाज मातेला आपली कुलस्वामिनी मानतात. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये ४ दिवसांची हिंगलाज माता यात्रा (नानी का हज) आयोजित केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार ही यात्रा कराचीमधील नानद पंथी आखाडा येथून सुरु होते. आखाड्यातील एका साधूची यात्रेचा प्रमुख निवड केली जाते आणि त्या साधूच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पार पडते. या यात्रेसाठी भारत आणि पाकिस्तानातून हजारो लोक हिंगलाजला जातात. काही लोक ही यात्रा पायी करण्याचा नवस बोलून या यात्रेचा कराची ते हिंगलाज हा अतिशय खडतर प्रवास पायी करतात.
