आपल्या मुलाला यशस्वी होताना बघणं याशिवाय आई -बाबांसाठी कोणताच मोठा आनंद नसतो. आणि यश मिळालेलं असतानाही आई-बाबांची आठवण ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. यासंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकत्याच चीन येथे पार पडलेल्या स्विस ग्रँड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू आर. वैशाली हिने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे. हा तिच्या कारकिर्दीतला आणि भारतीय बुद्धिबळ इतिहासातील सुवर्णक्षण ठरला आहे.
आर. वैशाली हिला जेव्हा ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तेव्हा तिने तिच्या आईलासुद्धा स्टेजवर बोलावले. आणि तिला ती ट्रॉफी द्यायला सांगितली. मुलीच्या या यशामुळे आईला आनंदाश्रू अनावर झालेले पाहून नेटिझन्सदेखील भारावून गेले आहेत.
स्विस ग्रँड स्पर्धेत तिने चीनच्या विश्वविजेत्या Zhongyi Tan चा पराभव केला. यामुळे तिला आगामी कॅंडिडेट्स टूर्नामेंटमध्ये प्रवेश मिळाला आहे. आर. वैशाली ही भारतीय बुद्धिबळपटू आणि विश्वजेत्या कार्लसनला हरवणाऱ्या सर्वात तरुण चेस ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदची बहीण आहे. तिला ट्रॉफी देताना आर. प्रज्ञानंद आणि त्यांची आईही उपस्थित होती. आपल्या मुलांच्या या यशामुळे ती भारावून गेलेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा भाऊ आर. प्रज्ञानंद याचीही या स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
