मुंबईचा डॅडी परतला! | Arun Gawli | Daddy | Arun Gawli Steps Out of jail | Mumbai Underworld

News

“त्यांच्याकडे दाऊद आहे, तर आमच्याकडे गवळी”
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या या विधानाने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवं नाव दिलं. ते नाव जे मुंबईपासून थेट संसदेत पोहोचलं.

मुंबईचा सुपारी किंग ज्याने दाऊदचे सगळे शत्रू संपवले. पण अखेरीस तोच स्वतः दाऊदचा सर्वात मोठा शत्रू झाला. तो डॉन ज्याने ताकद, राजकारण आणि कायदा आपल्या ढालीसारखं वापरलं. एकेकाळी दाऊदशी लढण्यासाठी त्याने तब्बल 600 शूटरची फौज तयार केली होती.

70 आणि 80 चं दशक हे मुंबई अंडरवर्ल्डसाठी महत्वाचं होतं. मुंबईचे जुने डॉन मागे हटत होते, आणि दाऊदसारखे नवे डॉन उभे राहत होते. त्या काळी मुंबई कपड्यांच्या गिरण्यांचं केंद्र होती. पण हळूहळू गिरण्या बंद झाल्या, लाखो लोक बेरोजगार झाले. त्या मजुरांपैकीच एक होता – अरुण गुलाब गवळी. जो क्रॉम्प्टन ग्रिव्ह्जमध्ये काम करत होता.

इथेच त्याची भेट झाली सदा पावले, रमा नाईक आणि बाबू रेशीम यांच्याशी. त्यांनी गवळीला गुन्हेगारीच्या जगात ओढलं. पण गवळीला लगेचच कळलं की या धंद्यात muscle power किती आवश्यक आहे. त्यावेळी परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक मराठी लोकांना नोकऱ्या मिळत नव्हत्या गवळीने याच स्थानिक मराठी युवकांना आपल्या गटात सामील करून घेतलं.

बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी या तिघांनी त्यांच्या गटाला B.R.A. गॅंग असं नाव दिलं. नव्या नावाच्या आणि नव्या गटाच्या जोरावर गवळी रिअल इस्टेटच्या धंद्यात श्रीमंत आणि ताकदवान झाला. ताकद वाढवण्यासाठी त्याने स्थानिक भायखळा कंपनीच्या लीडरचा खून केला. आणि मग तो झाला भायखळ्याचा नवा गुंड.

या गुन्ह्यामुळे त्याला आणि साथीदारांना दोन वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगात गवळीची भेट दाऊदच्या right hand शी म्हणजे बडा राजन सोबत झाली. जेलमध्ये बडा राजनशी ओळख झाल्यानंतर गवळी दाऊदच्या टोळीचा महत्वाचा भाग बनला. 80 च्या दशकाच्या सुरुवातीला त्याने दाऊदसाठी अनेक हत्या केल्या. त्यामुळे लोक त्याला सुपारी किंग म्हणू लागले. पण 80 च्या दशकाच्या शेवटी दाऊद स्वतःला बॉस मानू लागला आणि दुबईला जाऊ लागला. इथून गवळी आणि दाऊद यांच्यात भयंकर संघर्ष सुरू झाला.

गवळीचे साथीदार बाबू रेशीम, रमा नाईक – मारले गेले. त्याचा सल्लागार अशोक जोशीही मारला गेला अखेरीस तो जवळपास एकटाच राहिला.

एकेकाळी 600 शूटर असलेला गवळी दगडी चाळीचा आडोसा घेऊन राहू लागला. तर त्याचा भाऊ किशोर गवळी खुलेआम फिरत होता. पण त्याचाही खून झाला. या घटनेनंतर गवळी शांत झाला. आणि मग काही वर्षात पुन्हा दगडी चाळीत गवळीचं राज्य सुरू झालं. रोज लोक त्याच्या दाराशी जमत आणि समस्या सांगत. तो राजा असल्यासारखा निर्णय घेत असे. इथेच गवळीच्या आयुष्यात आली जुबैदा मुझावर, जी नंतर गवळीच्या आग्रहावरून धर्म बदलून आशा गवळी झाली. तीच त्याची सर्वात मोठी सल्लागार ठरली.

गवळी दगडी चाळीत गणपती, दुर्गा पूजा साजरी करू लागला. चाळीतील लोकांसाठी तो एक रॉबिनहुड झाला ज्याला लोक प्रेमाने daddy म्हणू लागले.

त्यांच्याकडे दाऊद आहे, तर आमच्याकडे गवळी या बाळासाहेबांच्या वाक्यामुळे गवळीला वाटलं की आता त्याला कुणी हात लावू शकत नाही. पण उलटच झालं. त्याला एका प्रकरणात अटक करण्यात आली. 1994 मध्ये आशा गवळीने पत्रकार परिषदेत दावा केला की दाऊदने मुंबई पोलिसांना लाच दिली आहे आणि गवळीला खोट्या प्रकरणात अडकवून एनकाउंटर करण्याचा कट रचला जातोय.

गवळीला वाटलेलं त्याला या प्रकरणात शिवसेना साथ देईल, पण तसं झालं नाही. या घटनेनंतर मात्र गवळीने राजकारणाकडे वळायचं ठरवलं. त्याने अखिल भारतीय सेना नावाची स्वतःची पार्टी स्थापन केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला खेचून तो राजकारणात उतरला.

पण त्याच्या राजकारणाचा आणि गुंडगिरीचा अंत ठरणारी एक घटना घडली २००७ साली. अखिल भारतीय सेनेच्या अजीत राणे यांचा पराभव करून शिवसेनेच्या कमलाकर जामसंडेकर यांनी विजय मिळवला होता. याच घटनेचा राग डोक्यात ठेऊन कमलाकर जामसंडेकर यांची त्यांच्या रहात्या घरात हत्या करण्यात आली. आणि याचे धागेदोरे थेट अरुण गवळी याच्यापर्यंत पोहोचले. 28 ऑगस्ट 2012 रोजी न्यायालयाने शिवसेनेच्या आमदाराच्या खुनाच्या प्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अर्थात जेल मध्ये असताना अरुण गवळीची वागणूक बदलली. गांधीजींच्या विचारांवर आधारित असलेल्या परीक्षेत अरुण गवळी याने पहिला नंबर पटकावला होता. या परीक्षेसाठी आवश्यक असलेली गांधीजींची पुस्तकं तर त्याने वाचलेलीच सोबत जेल लायब्ररी मधून तो इतर सुद्धा अनेक पुस्तकं वाचत होता मधल्या काळात त्याची दह्शद आणि गुंडगिरीला पूर्णविराम लागला.

आता ३ सप्टेंबर २०२५ रोजी अरुण गवळी याची तब्बल १७ वर्षानंतर जामिनावर सुटका झाली आहे. अरुण गवळी आता जेल बाहेर आला आहे. आजुबाजूच राजकारण आता पूर्णपणे बदललेलं आहे पण एकेकाळचा हा गुंड आजही कित्येक लोकांसाठी डॅडीच आहे.

Leave a Reply