Apple कंपनी दरवर्षी आयफोन सिरीज लाँच करते. यावर्षी अॅपलने खास ग्राहकांसाठी पुढची सिरीज म्हणजेच iPhone 17 लाँच केली आहे. या सिरीजमधील एका मॉडेलने सगळ्याच ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. 17 सिरीजमधील लक्षवेधी फोन iPhone Air. अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात स्लीम फोन म्हणून या मॉडेलची विशेष चर्चा होत आहे.
17 सिरीजमधील iPhone Air हा मागील मॉडेल्सपेक्षा एक-तृतीयांश स्लीम फोन आहे. त्याच्या टायटॅनिअम बॉडीमुळे फोनला अधिक वजनही जाणवत नाहिय. यामध्ये AI आधारित फोटोग्राफी फीचर्स, टेलिफोटो लेन्ससह सिंगल कॅमेरा आणि बॅटरी-सेव्हिंग सॉफ्टवेअर देण्यात आलेले आहे. फोनमधील बॅटरीची क्षमता कमी असली तरीही फोन दिवसभर सहज चालणार असल्याची शाश्वती कंपनीने दिली आहे. या 256GB मॉडेलची किंमत भारतामध्ये 1,19,000 अशी असणार आहे.
मात्र हा भन्नाट फोन डिझाईन करणाऱ्या व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या डिझायनरचे नाव आहे अबिदुर चौधरी.
कोण आहे अबिदुर चौधरी?
अॅपल मध्ये अबिदुर इंडस्ट्रियल डिझायनर म्हणून काम करतो. अबिदुरचा जन्म आणि शिक्षण लंडनमध्ये झाले असून, सध्या तो सॅन फ्रान्सिस्को येथे राहतो. लॉफबरो विद्यापीठातून प्रोडक्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. शिक्षणादरम्यान त्याने 3D हब्स स्टुडंट ग्रँट, जेम्स डायसन फाउंडेशन बर्सरी, केनवुड अप्लायन्सेस अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार जिंकले. त्याच्या ‘प्लग अँड प्ले’ डिझाईनला 2016 मध्ये रेड डॉट डिझाईन अवॉर्ड मिळाला होता.
अबिदुरने आपल्या करिअरची सुरुवात यूकेतील केंब्रिज कन्सल्टंट्स आणि कर्व्हेंटा या कंपन्यांमधील इंटर्नशिपने केली. त्यानंतर लंडनच्या लेयर डिझाईनमध्येही काम केले. 2018-19 दरम्यान त्याने स्वतःची डिझाईन कन्सल्टन्सी सुरू केली आणि मोठ्या ब्रँड्ससोबत काम केले.
जानेवारी 2019 मध्ये तो अॅपलमध्ये इंडस्ट्रियल डिझायनर म्हणून रुजू झाला. त्याने कंपनीसाठी महत्त्वाच्या उत्पादनांवर काम केले असून iPhone Air हे त्याचे सर्वात लक्षवेधी डिझाईन ठरले आहे. क्युपर्टिनो लाँच इव्हेंटमध्ये, “It’s a paradox you have to hold to believe,” असे त्याने सांगितले.
यंदाच्या iPhone 17 सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max देखील सादर करण्यात आले आहेत. मात्र ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे ते iPhone Air ने.
