Open relationships India : विवाह म्हणजे दोन कुटुंब-दोन व्यक्ती जोडणारे बंधन असते, असं भारतीय संस्कृतीत मानले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष महत्त्व आहे. विवाह हा एकमेकांप्रती प्रेम विश्वास प्रामाणिकता यावर अवलंबून असतो. देव-ब्राह्मणांच्या साक्षीने, तसेच आपल्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडतो.
अशा या विवाह संस्थेत विवाहबाह्य संबंध गैर/अनैतिक मानले जातात. परंतु, आता विवाहाची ही संकल्पना बदलत चालली आहे. तिशीत असणारे लोक आता ‘ओपन मॅरेज’ (Open Marriage) हा पर्याय निवडत आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या इन्फ्लुएन्सर वाग्मिता सिंगच्या एका ‘रील’ने या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. ओपन मॅरेज म्हणजे नक्की काय? हा ट्रेंड का वाढतोय?
Why Open Marriage ?
डेटिंग ॲप ‘ग्लीडेन’च्या (भारत) कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, “भारतात आजही अरेंज मॅरेज मोठ्या प्रमाणावर होतात. पण विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. विशेष म्हणजे, २० ते ३५ वर्ष वयोगटातील पिढी लग्नाबद्दल स्वतःची मतं सांगतात. या वयातील अनेक लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या नात्यांबद्दलच्या अपेक्षा स्पष्ट आहेत.”
‘ग्लीडेन’नं केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, ३५ टक्के लोक सध्या ‘ओपन रिलेशनशिप’मध्ये आहेत आणि ४१ टक्के लोकांनी सांगितलं की, जर त्यांच्या जोडीदारानं असं सुचवलं तर तेदेखील हा पर्याय निवडतील. म्हणजेच आजची पिढी ऑप्शन्ससाठी ओपन आहे. पर्यायी नातेसंबंधांबद्दल म्हणजे अगदी ठरवून केलेल्या विवाहामध्येही अधिक मोकळेपणा येत आहे.
याचदरम्यान, सिक्रेट रिलेशनशिपसाठी असलेल्या ‘ॲशले मॅडिसन’ (Ashley Madison) या प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार लहान भारतीय शहरांमध्येही आता Non-traditional relationships अधिक प्रमाणात दिसतात. या यादीत कांचीपुरम शहर सर्वांत पुढे आहे. तिथे विवाहबाह्य संबंधांमध्ये (Extra-marital affairs) सर्वाधिक रस दिसून आला आहे. याव्यतिरिक्त दिल्लीतील रिलेशनशिप काउन्सिलर रुची रुह यांनीही सांगितलेले की, लोकांना नेहमीच नवीन गोष्टींची ओढ असते. विवाह आधीच्या टप्प्यात आणि विवाहानंतरच्या टप्प्यातही ते नवीन ऑप्शन्स बघत असतात. पूर्वी या गोष्टी लपून छपून केल्या जात होत्या. आता लोक ‘ओपन मॅरेज’चा पर्याय निवडतात.
‘ओपन मॅरेज’चा ट्रेंड भारतात वाढतोय का?
भारतात ‘ओपन मॅरेज’ अजूनही काही ठराविक लोकांपर्यंत मर्यादित असले तरी त्यांना हळूहळू स्वीकारले जात आहे. ‘ग्लीडेन’च्या आकडेवारीनुसार, टियर १ शहरांमध्ये याचा स्वीकार अधिक आहे; पण टियर २ शहरांमध्येही ‘नॉन-मोनोगॅमी’बद्दल (अनेक लोकांशी संबंध ठेवणे) लोकांना कुतूहल आहे. या बदलाची कारणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, जागतिक संस्कृती व विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे आताची पिढी ओपन मॅरेज चा पर्याय स्वातंत्र्यासाठी निवडत आहे. पण लिव्ह इन रिलेशनशिप हा पर्यायसुद्धा फारसा समाजमान्य नसल्यामुळे ओपन मॅरेज लोक-समाज कसा स्वीकारेल का याविषयी शंका असल्याचे ही या सर्व्हे मध्ये सांगितले आहे.
