panjab visa fraud 14 marriage

Fake husband visa fraud Viral : व्हिसा मिळवण्यासाठी एका महिलेने केली १४ लग्न! पोलीसही झाले हैराण

News Trending

Punjab visa fraud case : परदेशात नोकरी मिळवणं हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं. काही जण तर लहानपणापासूनच परदेशात जाण्यासाठी शैक्षणिक तयारी करतात. जर तुम्हालाही आर्थिक प्रगतीसाठी परदेशात जायचं असेल, तर जरूर जा. पण जाताना योग्य व्यक्तीकडूनच कागदपत्रं तयार करून घ्या. अन्यथा तुमच्या माहितीचा गैरवापर करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. होय, असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एकाच महिलेचे १४ पती दाखवून त्यांना परदेशात पाठवल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. हे प्रकरण पाहून खुद्द युरोपमधील पोलीस देखील आवाक झाले आहेत.
कागदपत्रांचा कशाप्रकारे गैरवापर केला जातो, याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. झालं असं की, पंजाबमधील राजपुरा येथे राहणारे भिंदर सिंह हे इंग्लंडमध्ये नोकरीनिमित्त जात होते. त्यांची पत्नी इंग्लंडमध्ये वर्किंग व्हिसावर आधीच राहात आहे. तिने पती आणि मुलासाठी स्पॉन्सरशिपची व्यवस्था केली. या स्पॉन्सरशिपच्या मदतीने ते दोघे इंग्लंडमध्ये जाण्याची तयारी करत होते.

यासाठी त्यांनी एका इमिग्रेशन एजंटकडे आपली कागदपत्रे दिली आणि व्हिसासाठी अर्ज केला. पण हा एजंट मोठा घोटाळेबाज निघाला. त्याने त्याच कागदपत्रांचा वापर करून इतर १४ लोकांना बनावट व्हिसावर इंग्लंडला पाठवलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्हिसा मिळवून देताना एजंटने त्या १४ पुरुषांची ओळख भिंदर सिंह यांच्या पत्नीचे पती म्हणून दाखवली. या फसवणुकीमुळे अर्थातच भिंदर सिंह यांचा व्हिसा अर्ज नाकारण्यात आला. इतकंच नाही, तर भिंदर सिंह यांच्या पत्नीला इंग्लंडमध्ये अटकही करण्यात आली.

जेव्हा तेथील पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला, तेव्हा हा मोठा घोटाळा समोर आला. या प्रकरणात भिंदर सिंह यांची आर्थिक फसवणूक सुद्धा झाली आहे. या घटनेमुळे परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पंजाब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि लवकरच सर्व आरोपी गजाआड असतील, असं आश्वासन त्यांनी पीडितांना दिलं आहे.

हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याचं एक मोठं उदाहरण आहे. त्यामुळे परदेशात नोकरीसाठी अर्ज करत असताना काळजी घ्या आणि फक्त अधिकृत मार्गानेच व्हिसासाठी अर्ज करा. अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.

Leave a Reply