Blood Moon 2025: आज भारतातून दिसणार सर्वात मोठा “रक्तचंद्र”; कुठे व कधी पाहाल?

Lifestyle News

सुरज हुआ मद्धम चाँद ढलने लगा… या K3G मधल्या या गाण्याचे शूट करताना करन जोहरला सूर्य मावळताना, उगवताना असे अनेक शॉट्स घ्यावे लागले होते, तेही अनेक दिवस… पण एक गम्मत सांगू का, आज होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणात तुम्हाला असेच काही असेच सीन पहायला मिळणार आहेत मात्र ते चंद्राचे असतील. कारण यावेळी चंद्र आणि पृथ्वी यांचा असा काही लपाछपीचा खेळ चालणार आहे की तूम्ही ते पाहून दंग व्हाल. या चंद्रग्रहणात आपल्याला पौर्णिमा-अमावास्या-पौर्णिमा अशी उत्सुकता वाढवणारा नजारा दिसणार आहे. चला तर मग या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून.

चंद्रगहणाचा काळ
या वर्षातले हे दुसरे चंद्रग्रहण असून, आज भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे. ग्रहणाचा प्रारंभ रात्री 9 वाजता होणार आहे. सुमारे 82 मिनिटे हे ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप आणि भारतात पाहायला मिळेल.

रक्तचंद्र (Blood Moon)
या वेळी चंद्राचा एक भाग पृथ्वीच्या सावलीत झाकलेला दिसेल. सावली हळूहळू वाढत जाऊन मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीत लपेल. यालाच खग्रास म्हणतात. पुढील टप्प्यात चंद्र सावलीतून बाहेर येऊ लागेल आणि साधारण रात्री अडीच वाजता पुन्हा पूर्णपणे उजळलेला दिसेल. या संपूर्ण प्रक्रियेत चंद्र लालसर किंवा तांबूस दिसतो. म्हणून याला रक्तचंद्र (Blood Moon) असेही म्हटले जाते.

भारतीय संस्कृतीत चंद्रग्रहणाला वेगवेगळ्या धार्मिक परंपरेचा संदर्भ आहे. ग्रहणाच्या काळात काही जण खाणे-पिणे टाळतात. गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जातात. मंदिरांचे दरवाजे ही बंद ठेवले जातात. ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करून शुद्धीकरण केले जाते.

कुणाला शुभ तर कुणाला घातक?
हिंदू पंचागानुसार, ग्रहणाचा काही राशींवर चांगला परिणाम होणार आहे तर काही राशींवर संकटाचे सावट असणार आहे. मेष, वृषभ, कन्या आणि धनु राशीच्या मंडळींना हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे, तर मिथुन, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या मंडळींना हानिकारक ठरणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

हे 2025 या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आहे. याआधी मार्च महिन्यात एक ग्रहण झाले होते. मात्र 2022 नंतर यावेळी पहिल्यांदाच ब्लड मून दिसणार आहे.

Leave a Reply