राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. विसर्जन म्हटले की मिरवणुक आली आणि मिरवणुक ढोल-ताशांचा गजराशिवाय निघत नाही. मात्र बिग बॉस 18 फेम अभिनेत्री कशिश कपूर या ढोल-ताशांच्या आवाजावरच आक्षेप घेतला आहे. इतरांना त्रास होई पर्यंत भक्ती कशाला करावी, या आशयाचा तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओमुळे कशिश वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
2 सप्टेंबर 2025 रोजी अनेक घरांतील गौरी-गणपतींचे विसर्जन होते. कशिश ज्या इमारतीत राहते त्या इमारतीमध्ये देखील गणपतींचे विसर्जन होते. या व्हिडीओमध्ये कशिशने सांगितले की, ती 20 व्या मजल्यावर राहते, तरी ढोल ताशांच्या आवाजाचा तिला त्रास झाला. तीन तासांपेक्षा अधिक वेळ हा आवाज सातत्याने सुरू असल्याने त्याचा त्रास झाल्याचे तिने व्हिडीओद्वारे व्यक्त केले.
या व्हिडीओमध्ये, त्रास देऊन कोणती भक्ती केली जाते? असा सवाल केला आहे. या व्हिडीओवर अनेक धर्मरक्षकांच्या कमेंट्स येतील. पण कमेंट करण्याआधी माझा मुद्दा समजून घ्या, असे तिने म्हटले आहे. पुढे, मी 20 व्या मजल्यावर राहते. आता माझ्या घरातील सर्व दारे, खिडक्या बंद आहेत. तरीसुद्धा खाली सुरू असलेला ढोल ताशांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत आहे. या आवाजाने मला त्रास होत आहे. गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आहे, हे मला मान्य आहे. मी सुद्धा गेले होते. विसर्जन महत्वाचं आहे हे मी समजू शकते, मी सुद्धा त्याचा आनंद घेते. परंतू तीन तास सातत्याने कर्कश आवाजात ढोल-ताशे बडवत आहेत. वाजवायचं आहे तर तालबद्धतेत वाजवा पण इथे सातत्याने बडवत आहेत. त्यामुळे माझं डोक दुखायला लागलं आहे. आनंद साजरा करायचा असतो करा, पण त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. शिव्या देण्याची गरज नाही, तर समजून घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत कशिशने आपला मुद्दा मांडला.
कशिशच्या या व्हिडीओवर तिने म्हटल्याप्रमाणे, कमेंट्सचा पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये क्लब मधील रात्री उशिरापर्यंत डिजेचा आवाज सहन केला जातो, मग तीन तासाच्या भक्तीचा अनादर करणे योग्य नाही असे म्हटले आहे. तर एकाने एवढा त्रास होत असेल तर मुंबई बाहेर निघून जा, असा सल्ला दिला आहे. तर एकाने थेट “करिअर एंडिग व्हिडीओ” असे म्हटले आहे.
