Reason Immersion of Ganpati on One and Half, Fifth and Sixth Day : गणेशोत्सव म्हटला की सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळे जण उत्साहाने करत असतात. मोदक, तोरण, पूजा, आरत्या, रांगोळ्या असा फेस्टिव्हल माहोल सगळीकडे असतो. सार्वजनिक गणपती असो किंवा घरगुती गणपती आनंद-उत्साह सर्वत्र असतो. पण विसर्जनाचे दिवस जसे जवळ येतात तसं बाप्पा अजून थोडे दिवस का नाही थांबत असा प्रश्न आपल्याला पडतो. बाप्पाच्या विसर्जनाचे दीड, पाच, सात, नऊ, दहा दिवस कोणी ठरवले, जाणून घेऊया …
सर्वांना गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साहात सहभाही व्हायचं असतं; पण सध्या नोकरी, शाळा-महाविद्यालय आणि इतर धावपळीमध्ये अनेक जण फक्त दीड दिवसात गणपतीचं विसर्जन करतात. पण, ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामागील कारण वेगळं आहे आणि त्याचा संबंध शेती आणि शेतकऱ्यांशी जोडला जातो. चला तर मग जाणून घेऊ या दीड दिवसाच्या बाप्पाची गोष्ट’
दीड दिवसाच्या बाप्पाची गोष्ट
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीदरम्यान शेतांमध्ये धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी धरणीमातेचे आभार मानण्याची पद्धत आहे. यासाठी शेतातच गणरायाची मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जात असे. सुरुवातीला पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी या मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन केलं जात असे. गणेश पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी म्हणजे पार्थीव गणेश पूजनाचे व्रत आहे. या व्रताचा कालावधी दिवसाचे ४ आणि रात्रीचा १ असे ५ प्रहर धरले जातात. तसेच अशी ही एक मान्यता आहे की जेव्हा तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता तेव्हा त्यात एक प्रकारचे जीवत्व प्राप्त होते, ते एक दिवस राहते त्यामुळे एक दिवस ते व्रत करून बाप्पाचे विसर्जन दुसऱ्या दिवशी अर्थात दीड दिवसांनी केले जात असे.
पाचव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यामागचे कारण
गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात.
बऱ्याच लोकांना वाटते की, गणेशाची प्राणप्रतिष्ठापना फक्त चतुर्थीलाच होते; तर तसे नाही. काही ठिकाणी प्रतिप्रदेला गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असे १० दिवस गणेशोत्सव साजरा होतो. गणेश पुराणात श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत हे व्रत करून मग दीड दिवसाकरिता गणपतीची पार्थिव मूर्ती आणून तिची पूजा करावी असे सांगितले आहे.
गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?
काही जणांकडे पाचव्या दिवशी गौरीसह गणेशमूर्तीचेही विसर्जन केले जाते, तर काही जणांकडे पाचव्या दिवशी गौरीचे विसर्जन झाल्यानंतर, सातव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. मुळात गौरी आणि गणपती वेगवेगळ्या देवता आहेत. गौरीचे आगमन आणि विसर्जन हे नक्षत्रानुसार होते. ज्या नक्षत्रामध्ये त्यांचे आगमन होते, त्याच्या पुढच्या नक्षत्राला त्यांचे विसर्जन होते. अनुराधा नक्षत्राला गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्राला तिचे विसर्जन होते. नक्षत्र कधी कधी पुढे-मागे होतात; त्यानुसार कधी हे विसर्जन पाचव्या दिवशी होते; तर कधी सहाव्या-सातव्या दिवशी होते.
