मुंबईत गेले काही दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. आंदोलक मुंबईत आल्यानंतर आंदोलनच्या पहिल्या दिवशी मुंबईतील हॉटेल बंद ठेवली होती. आंदोलकांना अन्न-पाणी मिळण्यास त्रास झाल्याचे समजताच. राज्यभरातील अनेक गावांतून “एक शिदोरी आंदोलकांसाठी” असे अभियान सुरू करण्यात आले होते. आंदोलन संपल्याने अन्न आणि साहित्याची रास वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात लागली आहे. अन्नाची नासाडी होत असल्याने अखेर मदत थांबवा असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील अनेक हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. आंदोलकांना पिण्याचे पाणी देखील मिळेणासे झाले. ही बाब लोकांपर्यंत पोहोचताच गावागावांतून “एक शिदोरी आंदोलकांसाठी” असे अभियान सुरू करण्यात आले. ही सगळी मदत वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात जमा केली जात होती. इथून पुढे ती आंदोलकांपर्यंत पोहचविण्यात येणार होती.
प्रत्येक गावातून भाकरी, चपाती, ठेचा, लोणचे, भाजी, पाणी तसेच इतर जीवनावश्यक साहित्य पाठविण्यास सुरूवात झाली. या मदतीचे प्रमाण इतके जास्त वाढले की वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात चार ठिकाणी भाकरी व इतर साहित्य ठेवावे लागले. मदतीमध्ये पाठवलेली भाजी खराब होणारी असल्याने तात्काळ वेगळी करून भाकऱ्या एका ठिकाणी जमा केल्या गेल्या. आलेले अन्न आंदोलकांना देण्याचे प्रयत्न सुरू होते. काही आंदोलकांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावत अन्न वाटप केले. आंदोलन सुरू झाल्यापासून तब्बल 10 लाख भाकऱ्या प्रदर्शन केंद्रात जमा झाल्या. संपूर्ण शहराला जेवण देता येईल, एवढे साहित्य जमा झाले. अखेर काल आंदोलकांनी भाकऱ्या खूप झाल्या आहेत आता मदत थांबवावी, असे आवाहन करण्यात आले.
गावातील सामान्य नागरिकांनी कुवतीप्रमाणे वर्गणी काढून हे अन्न, पाणी व इतर वस्तू पाठविल्या आहेत. त्यामुळे ते वाया जाऊ नये यासाठी मंगळवारी सायंकाळी आंदोलन संपल्यानंतर उरलेल्या भाकऱ्या, लोणचे, चटणीस आदी अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या मुंबईतील गरजू रूग्ण, अनाथ आश्रमातील मुले, यांना देण्याचा निर्णय मराठा आंदोलकांनी घेतला. त्याचबरोबर भाकरी, पोळी, चुरमुरे, फरसाण, चिवडा, पाण्याची बाटली, ठेचा, खर्डा, लोणचे व इतर पदार्थ मोठ्या प्रमाणात राहिल्याने ते सायन रूग्णालय, जे.जे रूग्णालय व काही अनाथाआश्रमातील गरजूंना वाटप करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
