Priya Marathe : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेच ३१ ऑगस्ट रोजी कॅन्सरमुळे निधन झालं. मराठी-हिंदी मालिकांमुळे ती अनेकांच्या घरा-घरात पोहचली होती. ऐन तारुण्यात तिचं निधन झाल्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रियाच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिला आपली लेक मानणाऱ्या मराठी दिग्दर्शक विजू माने यांनीदेखील भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दरम्यान, प्रिया मराठे गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. उपचारादरम्यान तिची प्रकृती सुधारली होती, परंतु,अखेर आजारावर मात करता आली नाही. तिचं 31 ऑगस्ट 2025 रोजी, मीरा रोड (मुंबई) येथील राहत्या घरी निधन झाले.
प्रिया मराठे ही मराठी मालिकांमुळे घराघरांमध्ये पोहचली होती. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ यांसारख्या मालिकांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, हिंदीमधील सुपरहिट मालिका ‘पवित्र रिश्ता’ मधील ‘वर्षा’ या भूमिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’, तसेच ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या शोजमध्ये तिने अनेक भूमिका केल्या. प्रियाच्या जाण्याने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
