History of First Locomotive Act मुंबई आणि तेथील रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या वाहनांसोबत वाहतूकीचे नियम देखील कठोर केले जात आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी आपण वाहतूकीच्या नियमांसंबंधित अनेक पाट्या पाहतो. यामध्ये शहरांमध्ये, गावांमध्ये तसेच महामार्गांवर वेगमर्यादेची देखील पाटी लावलेली दिसते. या पाट्यांवर वेग मर्यादा दिलेली असते. ती वेग मर्यादा ओलांडल्यास वाहतूक पोलिसांद्वारे केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? वेगमर्यादेचा पहिला कायदा ब्रिटनमध्ये लागू करण्यात आला होता. सदर लेखामध्ये आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
ब्रिटनमध्ये 1865 साली वेग मर्यादेकरीता पहिला कायदा लागू करण्यात आला होता. हा कायदा Red Flag Act या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. या काळात स्वयंचलित वाहनांचा नव्याने शोध लागला होता. त्या काळात अजून “कार” हा शब्द प्रचलित नव्हता. त्यांना Road Locomotives किंवा Steam Carriages असे म्हटले जात असे. या गाड्या केवळ कोळशावर किंवा स्टीम इंजिनवर चालणारी होती. घोडागाडी, बैलगाडी दळणवळणाकरीता जास्त वापरत असल्याने या गाड्या लोकांना धोकादायक वाटत.
या गाड्यांमुळे घोडागाडी, बैलगाडी अथवा इतर वाहनांना नुकसान पोहचू नये तसेच त्यांना इशारा मिळावा याकरीता हा कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्यानुसार ग्रामीण भागात वाहनांचा कमाल वेग 4 मैल प्रति तास (6 किमी/तास) आणि शहरात 2 मैल प्रति तास(3 किमी/तास) इतका ठेवण्यात आला होता.
या गाड्यांसाठी खास तीन जणांचे पथक असणे बंधनकारक होते. त्यापैकी एक वाहनाच्या पुढे 60 यार्ड (55 मीटर) अंतरावर लाल झेंडा घेऊन चालणे आवश्यक होते, जेणेकरून घोडागाडी किंवा इतर वाहनांना इशारा मिळावा. तसेच गरज भासल्यास त्यांना थांबविले देखील जायचे.
अर्थातच, काळ बदलला तसा लोकांचा दृष्टिकोनही बदलला. वाहनांचा वापर वाढल्याने त्यांची संख्या देखील वाढली. म्हणूनच 1865 च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. नवीन बदलानुसार वेगमर्यादा थोडी शिथिल करण्यात आली. 14 मैल प्रति तास (सुमारे 22 किमी/तास) अशी करण्यात आली. या काळात एवढा स्पीड म्हणजे खूप मानला जायचा.
सुरूवातीला हा कायदा घोड्यांसाठी बनविण्यात आला होता. घोडा वाहन बघून घाबरू नये यासाठी वाहनधारकांना कठोर नियमांचे पालन करावे लागत असे. पण लाल झेंड्यामुळे गाडी चालविणे अकार्यक्षम वाटू लागले आणि इतक्या कमी वेगाने प्रवास करणे देखील त्रासदायक वाटू लागले. अनेकांनी या नियमांना विरोध दर्शवला. यामुळे ब्रिटनमध्ये हा कायदा शिथिल करण्यात आला आणि पुढे मोटारगाड्यांच्या वाढीस गती मिळाली.
आज आपण 100-120 किमी/तास वेगाने गाड्या रस्त्यावर धावताना पाहतो. ट्रॅफिक कॅमेरे, नियम आणि दंड हे सगळे तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रित केले जातात. तेच दिडशे वर्षांपूर्वी गाड्यांपुढे लाल झेंडा घेऊन माणूस चालायचा. आज हे ऐकून कदाचित आपल्याला हसू येईल, पण त्या काळात हा कठोर नियम नागरिकांना पाळावा लागत असे.
