गणपती, विनायक किंवा गणेश – ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वधर्मीयांची प्रिय देवता मानली जाते. जातीधर्माच्या सीमा ओलांडून गणराय सर्वांना समान आश्रय देतो. फक्त भारतातच नाही, तर श्रीलंका, म्यानमार, जपान, कोरिया, चीन, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया अशा आशियातील अनेक देशांमध्येही गणपतीची उपासना होते. आज तर विदेशी पर्यटकही दरवर्षी वाढत्या संख्येने गणेशोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी भारतात येतात.
गणपतीची लोकप्रियता मध्ययुगात (सुमारे 9-10 वे शतक) मोठ्या प्रमाणावर वाढली. गाणपत्य संप्रदाय उदयास आला. पण या देवतेचा खरा उगम शोधायला निघाल्यास आपल्याला थेट अफगाणिस्तानापर्यंत प्रवास करावा लागतो!
गणपतीचा प्राचीन उल्लेख
ऋग्वेदात “बृहस्पती” किंवा “ब्रह्मणस्पती” या नावाने गणपतीचा उल्लेख आढळतो, असे काही तज्ञांचे मत आहे. मात्र हा गजमुख गणपतीचाच उल्लेख आहे का, यावर अद्याप मतभेद आहेत. त्यामुळे वैदिक वाड्म्य़ामध्ये गणपती हा केवळ गणांचा अधिपती याच अर्थाने होतो. सुरुवातीला प्राचीन साहित्यामध्ये गणपतीला “विनायक” असे संबोधले जात असे. मानवगृह्यसूत्रात चार विनायकांचा उल्लेख आहे. यामध्ये देवयजन, शालकंटक, उस्मित आणि कुष्माण्डराजपुत्र अशी नावे असून, हे विनायक लोकांच्या कामात विघ्न आणतात असे म्हटले आहे. त्यांची शांती करण्याच्या पद्धतीचे वर्णनही ग्रंथात मिळते.
हस्तिमुख विनायक
बौधायन गृह्यपरिशेष कल्प या ग्रंथात प्रथमच विनायक गजमुख असल्याचा उल्लेख आढळतो. येथे चार विनायक एकत्र होऊन एकच “हस्तिमुख विनायक” झाल्याचे म्हटले आहे. हाच नंतर विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता ठरतो. असा उल्लेख सापडतो.
बौद्ध आणि जैन धर्मातही गणपती
बौद्ध ग्रंथांमध्येही “विनायक” हे गौतम बुद्धांचे एक नाव आहे. तसेच हिंदू, बौद्ध आणि जैन – तिन्ही धर्मांमध्ये गणपतीची शिल्पाकृती आढळते. महाराष्ट्रातील लेण्याद्री आणि औरंगाबाद लेणी याची उदाहरणे आहेत.
अफगाणिस्तानातील पुरावे
प्राचीन गांधार प्रदेश (आजचा पाकिस्तान व अफगाणिस्तान) येथे हत्ती शुभ मानला जात असे. अनेक राजांच्या नाण्यांवर हत्तीचे चित्र दिसते, ज्याचा संबंध गणपतीशी जोडला जातो. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. म. के. ढवळीकर आणि डॉ. ए. के. नरेन यांच्या संशोधनानुसार, प्राचीन गांधार प्रदेशात प्रथमच विनायकाला हत्तीचे तोंड मिळाले आणि यक्षरूपात त्याची पूजा सुरू झाली. पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे हे साधार स्पष्ट केले आहे.
अफगाणिस्तानातील बेग्राम येथे प्राचीन काळातील अप्रतिम हस्तिदंती नक्षीकाम आढळते. येथील नगरदेवता हत्ती होती, असे चिनी भिक्खू ह्युआन श्वांग यांनी लिहिले आहे. कपिशा नगरीच्या नाण्यांवरही हत्ती व “कपिशिये नगरदेवता” असा उल्लेख आहे. आत्ताचे पाकिस्तान येथील चारसाढामध्ये सापडलेल्या नाण्यांवर ही पुष्कलावती नगरीतही हत्तीची उपासना होत असे. असे स्पष्ट झाले आहे. इंडोग्रीक राजांच्या नाण्यांवर हत्तीमुख देवतेचे चित्रण आहे, जे गणपतीशी साधर्म्य दर्शवते.
काबूलचा महाविनायक
अफगाणिस्तानातील गार्देज येथील मशिदीवर प्राचीन काळी महाविनायकाची शिल्पकृती होती. संगमरवरातील ही 28 इंच उंच शिल्पकृती मुकुटधारी, एकदंत गणपतीची प्रतिमा होती. पर्शियन कलेचा प्रभाव असलेल्या या मूर्तीला “महाविनायक” म्हणून संबोधले जात असे. 1980 मध्ये ही मूर्ती काबूल राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आली, पण तालिबानी राजवटीत नष्ट झाली. आज तिचे केवळ छायाचित्रच शिल्लक आहे.
