Gabaoatibappa-Moraya-Why-we-called-Moraya

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! पण ‘मोरया’चा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

Lifestyle Trending

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया ! लवकरच हा जयघोष प्रत्येक घराघरात होताना दिसेल. आपल्या लाडक्या बाप्पाचा जयघोष करताना आपण गणपतीबाप्पा मोरया म्हणतो पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे मोरया म्हणजे काय ? आपण बाकीच्या देवांना मोरया म्हणत नाही, फक्त गणपतीबाप्पालाच का म्हणतो? तर मग जाणून घेऊया गणपती बाप्पा मोरया का म्हणतात…

ही गोष्ट आहे ७०० वर्षांपूर्वीची… महाराष्ट्रातील पुणे शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावात मोरया गोसावी या परमभक्ताची..
वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी ४२ दिवस थेऊर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांच्यावर श्रीगणेश प्रसन्न झाले. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी-चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले. चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की, नदीमध्ये अंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेशमूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला.

मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. वयाच्या ११७ वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. आपल्या व्रत मोडल्यामुळे ते दुःखी झाले. एके दिवशी श्रीगणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.

दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली.हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते.
मोरया गोसावी यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची कठोर तपश्चर्या आणि भक्ती पाहून गणपती बाप्पांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, ”माझी भक्ती चिरायू होवो. मला तुझ्यापासून कधीही अंतर देऊ नकोस.” तेव्हा श्रीगणेश म्हणाले, आजपासून माझ्या नावासह तुझेही नाव जोडले जाईल. तुझ्या नावाशिवाय माझ्या नावाचा कधीही जयघोष होणार नाही.” तेव्हापासून गणपतीबाप्पा मोरया म्हणण्याची प्रथा सुरु झाली आणि ती चिरंतन राहील…
गणपतीबाप्पाच्या अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

Leave a Reply