गणपती बाप्पा आणि मोदक हे समीकरण ठरलेलं असतंच. कोकणात उकडीचे मोदक केले जातात. तर महाराष्ट्रात बहुतांशी भागात तळणीचे मोदक म्हणजेच कणकेचे मोदक करण्याची प्रथा आहे गणेश चतुर्थी असो, संकष्टी असो, गणपतीसाठी मोदक केले जातात. खवय्यांनादेखील केव्हा एकदा उकडीचे मोदक खायला मिळतील असं झालेलं असतं. बाप्पाचे आवडते मोदक भक्तगणांचा देखील आवडीचा पदार्थ!
मोदक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?किंबहुना मोदक आरोग्यदायी प्रसाद आहे हे जाणून तुम्हाला आनंदच होईल! चला तर मग जाणून घेऊ या मोदकाचे फायदे!
मोदकामुळे आपल्याला कधीही पचनाचे काही त्रास होत नाहीत, कारण त्यात खूप तेल किंवा साखर आहे असे नसते, त्यामध्ये ठराविक प्रमाणात खोबरे आणि गूळ वापरले जाते. पारंपरिक पद्धतीनुसार मोदक उकडीचे असतात. त्यामुळे ते पचनासाठी चांगले आहेत. तळणीपेक्षा उकडीचे मोदक खाणे आरोग्यासाठी पूरक आहेत. मोदक हा स्वतंत्रपणे खाण्याचा पदार्थ आहे. आपण नेहमी जेवणांनंतर मोदकावर ताव मारतो मात्र त्यापेक्षा थोडा वेळ घेऊन मोदकाचे सेवन केल्यास उत्तम!
मोदकामध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त आहे. एका मोदकामध्ये साधारण २५० कॅलरीज असतात. मोदकाचे सारण खोबरे , गूळ या पदार्थानी बनते आणि सारण तयार करताना त्यात तेल किंवा तूप वापरले जाते. ऊर्जेने भरपूर असणाऱ्या या पदार्थांमुळे एका मोदकाच्या सेवनामुळे देखील मोठ्या प्रमाणात शरीराला ऊर्जा मिळते. एका मोदकामध्ये ९ ते १० ग्रॅम फॅट्स आहेत, ६० ते ७० ग्रॅम कार्बोहायड्रेटस आहेत आणि ३ ते ४ ग्रॅम प्रथिने आहेत. एका जेवणामध्ये जितक्या कॅलरीज असणे आवश्यक आहे, त्यातील अर्ध्या कॅलरीज आपल्याला एका मोदकातूनच मिळतात.
मोदक तयार करताना त्यामध्ये तांदळाचे पीठ, खोबरं आणि गूळ हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात.तांदळाच्या पीठामध्ये व्हिटॅमिन बी १ असते जे आरोग्यासाठी चांगले असते. विशेषत: महिलांना मासिक पाळीमुळे होत असलेल्या वेदना कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी १ मदत करते. सारण तयार करताना वापरला जाणारा गूळ लोह वर्धक आणि पचनासाठी उत्तम आहे. गूळ ऊर्जादायक आहेच शिवाय रक्त शुद्धीकरणासाठी देखील उपयुक्त आहे.
मोदकामध्ये वापरलं जाणारं खोबरं हे सहसा ओलं खोबरं असतं, ज्यामध्ये चांगल्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात आणि खनिजे देखील असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.
मोदकाचे आरोग्यासाठी फायदे
मोदक हे ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स ने समृद्ध असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.
सांध्याच्या आरोग्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी मोदक हा खूप चांगला गोड पदार्थ आहे.
मोदकामध्ये चांगले कोलेस्ट्रॉलदेखील असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
मोदकामध्ये ब्युटिरिक ऍसिड शरीरातील दाहकता कमी करते.
ऊर्जेने भरपूर असणारे मोदक वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी पोषक पर्याय आहे .ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांनी मात्र मोदकाचे अति सेवन टाळावे
तळणीचे मोदक आणि उकडीचे मोदक
गव्हाचा वापर आपल्या आहारात खूप उशिरा सुरू झाला, त्यामुळे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार तांदळाच्या पीठापासून उकडीचे मोदक बनवले जातात. तळणीच्या मोदकांबाबत सांगायचे झाले तर कोणत्याही तळलेल्या पदार्थांमध्ये तितके पोषणमूल्य राहत नाही. पेढे किंवा तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा मोदक हा खूप चांगला पदार्थ आहे, जो आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो.
