गणेशोत्सव अगदी दारात आला असून कोकणवासीयांचा गावाकडे जाण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाही टोलमाफीची घोषणा केली आहे.
टोलमाफीचा लाभ कुठे मिळणार?
23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील सर्व टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष पास दिले जाणार आहेत. या पासवर वाहन क्रमांक व वाहनमालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीदेखील हेच पास मान्य राहतील.
शासनाने ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाला समन्वय साधून पास वाटपाचे आदेश दिले आहेत. भाविकांना वेळेत सुविधा मिळावी म्हणून जाहिराती व सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो वाहनधारक व गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटीकडून 5,200 जादा बस
फक्त टोलमाफीच नाही, तर परिवहन विभागानेही मोठी सोय केली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान तब्बल 5,200 जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष बससेवेत महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाणार आहे.
गर्दी टाळण्यासाठी महामुंबईत 40 तात्पुरते बसथांबे उभारण्यात आले आहेत. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या सोडल्या जाणार असल्याने कोकण प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
गणेशोत्सव काळात प्रवास सुरळीत व्हावा यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तत्काळ मदत मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास केवळ आनंददायीच नाही तर खर्चिकदृष्ट्याही हलका होणार आहे.
