Putin Poop Suitcase : जगातील महाशक्तीचे नेते जेव्हा भेटतात, तेव्हा सुरक्षेची पातळी नेहमीच सर्वोच्च असते. अलीकडेच अलास्का येथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची झालेली भेट याचेच एक उदाहरण. या बैठकीदरम्यान नेहमीप्रमाणे शेकडो सुरक्षा अधिकारी, प्रगत शस्त्रास्त्रे आणि कॅमेऱ्यांचा ताफा उपस्थित होता. मात्र, यावेळी खऱ्या चर्चेचा विषय ठरली ती एक विशेष सूटकेस—ज्यात ना दस्तऐवज होते, ना शस्त्रे, तर होती व्लादिमीर पुतिन यांची… विष्ठा!
होय, बरोबर वाचलंत. परदेश दौऱ्यादरम्यान पुतिन यांच्या अंगरक्षकांपैकी एकाकडे नेहमी अशी सूटकेस असते जी राष्ट्राध्यक्षांच्या मलमूत्राचे संकलन व वाहतूक करण्यासाठी खास डिझाइन केलेली आहे.
का घेतली जाते ही विचित्र खबरदारी?
अमेरिकेतील एक्सप्रेस यूएसच्या वृत्तानुसार, या सूटकेसचा उद्देश पुतिन यांच्या वैद्यकीय गोपनियतेचे रक्षण करणे हा आहे. गुप्तचर संस्था शत्रुराष्ट्रांच्या नेत्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या जैविक नमुन्यांचे विश्लेषण करतात. विष्ठा किंवा मूत्रातून मिळणाऱ्या डीएनए(DNA) व इतर क्लिनिकल माहितीमुळे एखाद्या नेत्याचा आजार किंवा शारीरिक कमजोरी उघड होऊ शकते. अशा संवेदनशील माहितीचा फायदा शत्रू देशांना होऊ नये म्हणूनचं पुतिन यांनी ही अनोखी सुरक्षा पद्धत अवलंबली आहे.
अनेक वर्षांची परंपरा
फ्रेंच प्रकाशन Paris Matchच्या अहवालानुसार, 2017 मध्ये फ्रान्स व 2019 मध्ये सौदी अरेबिया दौऱ्यावर असतानाही पुतिन यांच्या विष्ठेचे नमुने त्यांच्या अंगरक्षकांनी अशाच खास पाकिटांमध्ये गोळा करून मॉस्कोला परत नेले होते. रशियाच्या फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस (FSO)च्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आरोग्याच्या चर्चेला खतपाणी
72 वर्षीय पुतिन यांच्या आरोग्याबाबत अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. त्यांना पार्किन्सनसारखा न्युरोलॉजिकल आजार असल्याचे वारंवार बोलले गेले आहे. त्यामुळे परकीय गुप्तचर संस्था या शंका अधिक तपासू शकतात, याची भीतीच या सूटकेसच्या अस्तित्वामागे दडलेली आहे.
शस्त्रास्त्रे, गुप्तचर नेटवर्क, बॉडीगार्ड्स ही नेत्यांच्या सुरक्षेची नेहमीची साधने असतात. मात्र पुतिन यांची ही “विष्ठा सुरक्षा” दाखवते की गोपनीयतेसाठी देश कितीही विलक्षण पातळीवर जाऊ शकतात. एका सूटकेसमध्ये मावणारं हे गुपित आज संपूर्ण जगाच्या कुतूहलाचा विषय बनलं आहे.
