India’s vice president 2025 : महाराष्ट्र ठरला दुसऱ्यांदा भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी मानकरी!

News Political News

भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची नुकतीच निवड झाली. यामुळे उपराष्ट्रपती पदाचा महाराष्ट्राला दुसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे. याआधी शंकर दयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना १९८७ रोजी त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. योगायोग म्हणजे आधीच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यामुळे या दोघांची उपराष्ट्रपदी वर्णी लागली.

उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय मंडळाने राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. राधाकृष्णन यांची ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झालेली होती. १ वर्ष १७ दिवस ते राज्यपालपदी राहिले. शंकर दयाळ शर्माही १९८६ ते १९८७ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. आर. वेंकटरमण यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर त्यांनी उपराष्ट्रपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा झालेल्या निवडणुकीत शंकर दयाळ शर्मा यांची बिनविरोध निवड झालेली. पुढे पाच वर्षांनी १९९२ मध्ये त्यांची राष्ट्रपतीपदी वर्णी लागली.

यावेळी जगदीप जनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. एनडीएकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे त्यांचाच उमेदवार उपराष्ट्रपती होणार हे निश्चितच होते . त्यानुसार झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांची अधिकृत निवड करण्यात आली.

महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल रमेश बैस, विद्यासागर राव, भगतसिंह कोश्यारी यांच्याप्रमाणे सीपी राधाकृष्णन यांची कारकीर्द वादग्रस्त नव्हती. भाजप आणि मित्र-विरोधी पक्षांच्या वादापासून ते कायमचं दूर राहिले. त्यामुळे तुलनेने राजकीय डाग नसलेली व्यक्ती भारताच्या उपराष्ट्रपदी येत आहे.

इंटरेस्टिंग बाब म्हणजे, सीपी राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत. आणि पुढील वर्षी त्यांच्या विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. अनेक प्रयत्न करूनही भाजपाला तामिळनाडूत पाय रोवता आला नव्हता. आता तेथीलच व्यक्तीला उपराष्ट्रपतीपद देऊन त्याचा प्रचारात महत्त्वाचा मुद्दा ते करू शकतात.

Leave a Reply