“सारे जहाँसे अच्छा” लिहिणाऱ्या कवीला पाकिस्तानच्या निर्मितीसाठी जबाबदार का मानलं जातं?

News

“मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा”
ही ओळ ऐकली की प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना उचंबळून येते. पण या ओळीं रचणारे कवी मोहम्मद इकबाल हे पुढे पाकिस्तानच्या निर्मितीमागील महत्त्वाचा विचारवंत ठरले. हे ऐकून अनेकांना धक्का बसतो. हा विरोधाभास कसा घडला, याची कहाणी समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

इकबाल यांचा जन्म आणि शिक्षण
मोहम्मद इकबाल यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1877 रोजी सियालकोट येथे (आजचा पाकिस्तान) एका काश्मीरी व्यापारी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांची भाषेची आणि कवितेची ओढ स्पष्ट होती. लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. पुढे ते युरोपात गेले आणि केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची डिग्री मिळवली. जर्मनीतील म्युनिक विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. युरोपात असताना त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, पण त्याच वेळी इस्लामच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा गहन अभ्यासही चालू ठेवला. पश्चिमेकडील भौतिकवादावर त्यांनी टीका केली आणि इस्लामी जीवनपद्धतीच्या तत्त्वांवर त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

भारतीय राष्ट्रवाद
1904 — “तराना-ए-हिंदी” आणि भारतीय राष्ट्रवाद
1904 साली लाहोर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना इकबाल यांनी “तराना-ए-हिंदी” लिहिली. ही कविता लखनऊच्या इत्तेहाद साप्ताहिकात प्रकाशित झाली आणि देशभर गाजली.
कवितेतील”सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा” हा भाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचा आणि एकाच मातृभूमीप्रेमाचा होता. ही रचना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनली आणि स्वातंत्र्यलढ्यात ती देशभक्तांना प्रेरणा देऊ लागली.

विचारांमध्ये पहिला बदल
1905 ते 1908 हा काळ इकबाल यांनी युरोपात घालवला. या काळात त्यांनी पाहिलं की पश्चिमी राष्ट्रवाद हा भौगोलिक सीमा आण राजकीय सत्तेवर आधारित आहे, तर इस्लामचा इतिहास धार्मिक बंधांवर उभा आहे. 1910 साली अलीगढ मुस्लिम विद्यापीठात त्यांनी “इस्लाम: सामाजिक आणि राजकीय आदर्श” हे व्याख्यान दिलं. यात त्यांनी इस्लामकडे केवळ धार्मिक श्रद्धा म्हणून नव्हे, तर राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचा आधार म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली.त्याच वर्षी त्यांनी “तराना-ए-मिल्ली” लिहिली “मुस्लीम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा” यातून त्यांनी जागतिक मुस्लिम ओळख ही प्रादेशिक राष्ट्रीयतेपेक्षा श्रेष्ठ असल्याचं प्रतिपादन केलं.

धार्मिक राष्ट्रवादाचे 1920 चे दशक
1922 साली ब्रिटिश सरकारने त्यांना “सर” हा किताब दिला. त्याच वेळी त्यांना इस्लामी विद्वान म्हणून “अल्लामा” पदवीही मिळाली. इकबाल यांनी आपल्या कवितेत मुस्लिमांच्या इतिहासाचं गौरवगान केलं, सध्याच्या स्थितीबद्दल निराशा व्यक्त केली आणि मुस्लिमांना कृतीशील होण्याचं आवाहन केलं.

स्वतंत्र मुस्लिम राज्याची कल्पना
अलाहाबाद येथे 1930 साली झालेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात इकबाल यांनी पहिल्यांदा स्पष्ट शब्दांत उत्तर-पश्चिम भारतातील मुस्लिम बहुल प्रांतांसाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज मांडली.
त्यांचा विश्वास होता की हिंदू-मुस्लीम राजकीय सहजीवन दीर्घकाळ टिकणं अवघड आहे, कारण दोन्हींच्या सामाजिक-धार्मिक मूल्यांमध्ये मूलभूत फरक आहेत. हीच कल्पना पुढे पाकिस्तानच्या मागणीचा पाया ठरली. त्यामुळे इकबाल यांना “पाकिस्तानचे वैचारिक जनक” म्हटलं जातं.

जिन्ना आणि राजकीय वास्तव
1931 साली गोलमेज परिषदेत इकबाल आणि मोहम्मद अली जिन्ना यांची भेट झाली. जिन्ना तेव्हा काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये समन्वय साधण्याच्या भूमिकेत होते, पण पुढे त्यांचा मार्ग धार्मिक राष्ट्रवादाकडे वळला. 1935 च्या प्रांतिक निवडणुकांनंतर काँग्रेसला मोठं यश मिळालं, पण मुस्लिम लीगला अपेक्षित यश मिळालं नाही. प्रांतिक सरकारांत मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व न मिळाल्याने दोन्ही पक्षांमधला दुरावा वाढत गेला. 1937 नंतर जिन्ना यांनी पूर्णपणे मुस्लिम राष्ट्राच्या संकल्पनेला पाठिंबा दिला.

इकबाल यांच्या मृत्यूनंतरची घडामोड
इकबाल यांचं निधन 21 एप्रिल 1938 रोजी लाहोर येथे झालं. त्यांना बादशाही मशिदीसमोर दफन करण्यात आलं. पाकिस्तानच्या मागणीचा ठराव मार्च 1940 मध्ये लाहोर अधिवेशनात पारित झाला. म्हणजे इकबाल यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी. त्यामुळे ते प्रत्यक्ष पाकिस्तान “पळून” गेले असं म्हणणं चुकीचं आहे.

एका प्रवासाची कहाणी
मोहम्मद इकबाल यांचा प्रवास हा एका राष्ट्रवादी कवीपासून धार्मिक राष्ट्रवादाच्या विचारवंतापर्यंत पोहोचलेला प्रवास आहे. “सारे जहाँसे अच्छा” लिहिणारा हा कवी भारतातील एकात्मतेचा आवाज होता, पण काळानुसार त्यांच्या विचारांनी वेगळा मार्ग घेतला आणि त्या विचारांनीच पाकिस्तानच्या जन्माला वैचारिक आधार दिला. त्यांच्या आयुष्यातील हा बदल केवळ एका व्यक्तीच्या विचारांचा इतिहास नाही, तर 20व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागातील भारतीय उपखंडातील राजकीय, धार्मिक आणि सामाजिक बदलांचं प्रतिबिंब आहे.

Leave a Reply