सदर घटना आग्रा येथील बमरौली कटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे. बुधवारी रात्री एका महिलेने प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या सासऱ्याची प्रियकरासोबत मिळून हत्या केली. त्यानंतर सासऱ्याचा मृतदेह शेतात फेकून दिला. घटनेनंतर प्रियकरासोबत ती फरार झाली आहे. या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
या महिलेचे नाव बबली असे असून, मयत राजवीर यांच्या पत्नी मुन्नी देवी यांनी आपल्या सुनेविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, बबलीवर सासऱ्यांच्या खुनाचा आरोप आहे. राजवीर हे आपल्या सुनेला तिच्या परपुरुषासोबत नातेसंबंधाला विरोध करत होते. या रागातूनच तिने पतीची हत्या केली असल्याचा आरोप बबलीच्या सासुबाई मुन्नी देवी यांनी केला आहे.
मुन्नी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बबली हिने तिचा पती हरिओमची देखील हत्या केली होती. याप्रकरणी तब्बल साडेपाच वर्षे ती तुरूंगात होती. तुरूंगातच तिची ओळख प्रेमसिंहसोबत झाली. तिथेच बबली आणि प्रेमसिंह यांच्यामध्ये जवळीक झाली. प्रेमसिंहनेच बबलीची जामिनावर सुटका केली. सुटकेनंतर बबली आणि प्रियकर महल बादशाही परिसरात एकत्र राहत होते. हे राजवीर यांना समजताच त्यांनी सुनेला विरोध केला व प्रेमसिंहसोबतचे संबंध संपविण्यास सांगितले.
सासऱ्यांच्या विरोधाला कंटाळून बबली आणि प्रेमसिंहने त्यांना संपवण्याचा कट रचला. बबलीने राजवीर यांना आपल्यासोबत महल बादशाही येथे घेऊन गेली होती. रात्री बबली आणि प्रेमसिंहने राजवीर यांना शेतात नेऊन त्यांची गळा दाबून हत्या केली. सासरे गेल्याची खात्री केल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. आता पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.
