‘सैयारा’ चित्रपटातून सिनेसृष्टीत एंट्री घेणारी हिट जोडी अहान पांडे आणि अनीत पड्डा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण यावेळी कारण सिनेमाचं नाही, तर एका भन्नाट वायरल व्हिडिओचं आहे. ऑनस्क्रीन एखादी जोडी हिट झाली की प्रेक्षकांच्या डोक्यात एकच प्रश्न येतो “हे दोघे ऑफ-स्क्रीनही तितकेच रोमँटिक आहेत का?” शाहरुख-काजोल, सलमान-ऐश्वर्या, रणवीर-दीपिका यांनाही हा प्रश्न टाळता आला नाही आणि आता ‘सैयारा’ जोडीही त्याच चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या क्लिपमध्ये, अहान आणि अनीत अक्षरशः टेबलावर चढून नाचताना दिसत आहेत. यात अहान रंगीबेरंगी बॅगी शर्ट, गॉगल्समध्ये दिसतोय, तर अनीत मल्टीकलर ग्लिटर जॅकेट, मॅचिंग शेड्स आणि हाय हील्समध्ये आहे, त्यांच्या हा ग्लॅमरस लुक फॅन्सच्या नजरा खिळवून ठेवत आहे. हा व्हिडिओ खरं तर त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा BTS म्हणजेच पडद्यामागचे क्षण आहे. पण पडद्यामागचं हे दृश्य पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा ‘सैयारा’तील त्यांचा रोमँटिक सीन आठवला. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत “ही जोडी खरंच डेट करतेय का?” असा प्रश्नही विचारला.
काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज मिळवणाऱ्या या टेबल डान्सने, अहान-अनीतची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफ-स्क्रीन कनेक्शन, या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा हॉट टॉपिक बनवल्या आहेत. आता त्यांच्या फॅन्सना हा प्रोजेक्ट कधी रिलीज होणार? याचीच उत्सुकता लागली आहे.
