15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्यासोबतच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असल्याच राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांना या बंदीविषयी विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, महानगरपालिकेला हे ठरविण्याचा अधिकार नाही. कुणी काय खावे आणि काय खाऊ नये, हे ठरविण्याचा अधिकार ना सरकारचा आहे, ना महापालिकेचा.” त्यांनी पुढे संतप्त सवाल उपस्थित करत म्हटले, “एका बाजूला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांचे खाण्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे? हा कोणता स्वातंत्र्यदिन?”
फक्त कल्याण-डोंबिवली नव्हे, तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी अशा काही महापालिकांनीही 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवलीत काही राजकीय नेत्यांनी या दिवशी ‘मटण मेजवाणी’ ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर, पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
आयुक्त गोयल यांनी सांगितले, “शहरात मटण, मांस खाण्यावर बंदी नाही, तर विक्रीवर बंदी आहे.” म्हणजेच, नागरिकांना खाण्यापासून रोखले जाणार नाही, परंतु विक्रीस बंदी घालण्यात येईल. तरीही राज ठाकरे यांच्या मते, अशा निर्णयांचा स्वातंत्र्याशी विरोधाभास आहे आणि हे लोकांच्या वैयक्तिक निवडीवर गदा आणणारे पाऊल आहे. त्यांच्या मते, स्वातंत्र्यदिन हा लोकांच्या स्वातंत्र्याचा आणि अधिकारांचा उत्सव असायला हवा, मात्र सरकार किंवा स्थानिक प्रशासन अशा प्रकारे हस्तक्षेप करत असेल, तर तो मूळ संकल्पनेलाच हरताळ फासणारा आहे.
