गाझा शहरातील अल-शिफा रूग्णालयाबाहेर पत्रकारांसाठी लावलेला तंबू इस्रायलच्या हवाई हल्ल्याचे लक्ष्य ठरला. या हल्ल्यात पाच पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जेथे अनेक माध्यम प्रतिनिधी वास्तव्यास होते. ही घटना रविवारी रात्री उशीरा घडली.
अल जझिराने जाहीर केलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन अल जझिका वार्ताहर अन्स अल शरिफ आणि मोहम्मज क्रेइकेह यांचा समावेश आहे. तसेच कॅमेरामन इब्राहिम झाहर आणि मोहम्मद नौफल यांचाही मृत्यू झाला. पाचवा मृत पत्रकार स्थानिक फ्रीलान्स व्हिडीओग्राफर असल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्रायली लष्कराने अन्स अल शरिफ या पत्रकाराबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पत्रकार असल्याचे भासवून प्रत्यक्षात हमासचा ऑपरेटिव्ह म्हणून काम करत होता, त्याच बरोबर अनस अल शरीफ हा हमास या दहशतवादी संघटनेच्या सेलचा प्रमुख होता. त्याच्यावर इस्रायली लष्कर आणि सामान्य नागरिकांवर रॉकेट हल्ले आखणी करण्याचे काम करत असल्याचा आरोप लष्कराने केला आहे. लष्कराने दिलेल्या एका निवेदनात, गाझामधून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये आणि यादीमध्ये अल शरिफचा हमाससोबत थेट संबंध असल्याचे दिसते. पत्रकाराचे ओळखपत्र दहशतवादासाठी ढाल ठरू शकत नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
मृत्यूपूर्वी अल शरीफ याने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये गाझा सिटीच्या पूर्व आणि दक्षिण भागात वाढलेल्या बॉम्बहल्ल्यांबाबत माहिती दिली होती. व्हिडीओमध्ये बॉब्मस्फोटाचे आवाजही ऐकायला मिळत आहेत. व्हिडीओवर दिलेल्या कॅप्शनमध्ये गेल्या दोन तासांपासून सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत, गाझा शहरावरील इस्रायलचे हल्ले तीव्र झाले असल्याचे देखील त्याने म्हटले होते.
अल जझिरा आणि पत्रकार संरक्षण समिती यांनी हे आरोप फेटाळले असून, पुरावा न देता केलेले आरोप पत्रकारांवरील विश्वास आणि सुरक्षेवरील आघात असल्याचे म्हटले आहे. पत्रकार संरक्षण समितीने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंत गाझामध्ये किमान 186 पत्रकार ठार झाले आहेत, तर 90 हून अधिक पत्रकारांना इस्रायलने तुरुंगात कैदेत ठेवले आहे.
