भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले होते. नरवणेंच्या पुस्तकावरून सुरु झालेला वाद साहजिकच नेहरूंपर्यंत येऊन पोचला.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत गांधी परिवारावर सडकून टीका केली. त्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. स्पीकर ओम बिर्ला यांनी दुबेंना वारंवार टोकले, मात्र तरीही त्यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले. गोंधळ इतका वाढला की अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
त्यानंतर राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील दोन दिवसांच्या चर्चेला, पंतप्रधान संध्याकाळी पाच वाजता उत्तर देतील, असे जाहीर केले गेले. त्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या आसनासमोर गोळा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात, ‘जो उचित लगे वो करो’, असे लिहिलेला मोठा बॅनर आणला होता. या गदारोळात पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी कामकाज तहकूब केले.
खरंतर या भाषणासाठी मोदी चारच्या सुमारास संसदेमध्ये आले होते. पण कामकाज सुरू झाले तरी मोदी सभागृहात आलेच नाहीत. यामुळे ‘मोदी भित्रे असल्यामुळे ते सभागृहात उपस्थित राहिले नाहीत’, अशी थेट टीका काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यानी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केली. यावर भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, “ज्या ठिकाणी पंतप्रधान बसतात, तिथे विरोधक चढले होते. ते इतके आक्रमक होते की, जर पंतप्रधानांनी प्रवेश केला असता, तर त्यांच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता होती.” याच कारणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांना सभागृहात येण्यापासून रोखावं लागलं. मनोज तिवारी यांच्या दाव्यानुसार, ७ ते ८ महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घातला होता. मोदीजी भाषण द्यायला येणार होते तेव्हा काँग्रेस खासदारांनी त्यांचा रस्ता अडवला, त्यांना आणि ओम बिर्ला यांना मारण्याचा त्यांचा कट होता, असं भाजप खासदार कंगना रनौतने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हे सगळे आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मोदीजी एप्सटिन फाइल्स ला घाबरले आहेत म्हणून भाषण द्यायला आले नाहीत”. गुरुवारी जेव्हा मोदींनी भाषण सुरू केले तेव्हा विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी करत सभात्याग केला. आता खरंच मोदींना मारण्याचा कट होता का हे चौकशीनंतर कळून येईल.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
1996 साल... शिवसेना - भाजप युतीचे सरकार. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असावा ही संकल्पना…